Top News अर्थ अर्थसार अहमदनगर आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र करिअरनामा कायदाविश्व कोंकण क्रीडा ठळक बातमी ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड पुणे पुणे जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुखपृष्ठ मुंबई राज्य राष्ट्रीय रूपगंध विदर्भ व्हिडीओ

आघाडीवरील चेन्नईयिनचे नॉर्थईस्टसमोर कडवे आव्हान

पुणे – हीरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील आज (शुक्रवार) होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीची गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या चेन्नईयिन एफसीविरुद्ध लढत होत आहे. नॉर्थईस्ट तळात नवव्या क्रमांकावर असले तरी आव्हान पुन्हा निर्माण करण्याची प्रेरणा त्यांच्यासमोर असेल.

नॉर्थईस्टचे नऊ सामन्यांतून केवळ सात गुण आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या टप्यात त्यांना खेळ उंचावणे अनिवार्य आहे. बाद फेरीच्या आशा पल्लवित करायच्या असतील तर त्यांना सलग विजयांची मालिका गुंफावी लागेल. पूर्वी चेल्सी एफसीला मार्गदर्शन केलेले ऍव्रम ग्रॅंट नॉर्थईस्टला प्रेरित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, पण नॉर्थईस्टला मागील सामन्यात घरच्या मैदानावर एटीकेविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यामुळे गुवाहाटीतील या लढतीत खेळ उंचावणे नॉर्थईस्टकरिता सोपे नाही.

नॉर्थईस्टसाठी आताच सारे काही संपलेले नाही आणि हा संघ अजूनही झुंज देऊ शकतो असे सहाय्यक प्रशिक्षक इएल्को शॅट्टोरी यांना वाटते. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, संघातील एकूण वातावरण चांगले आहे. कामगिरी करून दाखविण्याची जिगर खेळाडूंकडे आहे. सरस खेळ करण्यासाठी ते प्रेरित झाले आहेत. संघातील समन्वय किंवा डावपेचांच्या अंमलबजावणीबद्दल बोलायचे झाले तर त्यासाठी खास करून आक्रमणात नेहमीच वेळ लागतो. बचावाच्या आघाडीवर आमच्यासमोर फार काही समस्या नाहीत.

नॉर्थईस्टने आणखी एका परदेशी खेळाडूला करारबद्ध केले आहे. हेलीओ पिंटो हा एकूण आठवा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. पूर्वी तो बेनफीकाकडून मध्यरक्षक म्हणून खेळला होता. तो मैदानावर उतरण्याची शक्‍यता आहे. चेन्नईयिनचे प्रशिक्षक जॉन ग्रेगरी यांना सुद्धा खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. शक्‍य तेवढे विजय मिळवून आघाडीवरील स्थान भक्कम करण्यासाठी चेन्नईयीन प्रयत्नशील आहे. यांनी सांगितले की, संघासाठी ग्रेगरी हे फार मोठे प्रेरणास्थान आहे. मैदानावर उतरल्यानंतर खेळाडूंकडेच सूत्रे असतात आणि मग कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. खेळाडू खरोखरच प्रेरित होऊन खेळतात. खेळाडूंना ग्रेगरी यांच्यासाठी हे सर्व सामने जिंकायचे आहेत.

ग्रेगरी यांना तीन लढतींसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे सहाय्यक प्रशिक्षक सय्यद साबीर पाशा पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ग्रेगरी यांच्या निलंबनाच्या कालावधीतील हा शेवटचा सामना असेल. चेन्नईयिन आणि नॉर्थईस्ट यांच्यात 13 गुणांचा फरक आहे. यानंतरही काहीही गृहीत धरण्याची चेन्नईयिनची तयारी नाही. पाशा यांनी सांगितले की, प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. दिल्ली डायनॅमोजने आम्हाला बरोबरीत रोखले. त्यामुळे आम्ही कोणत्याही संघाला कमी लेखू शकत नाही. प्रत्येक संघ चांगला आहे आणि त्यांच्याकडे महत्त्वाचे खेळाडू आहेत. आम्ही प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर खेळत असू आणि तेथील परिस्थिती वेगळी असेल. अवे सामना नेहमीच खडतर असतो. आम्हाला तीन गुण जिंकणे आवश्‍यक आहे.