Top News Uncategorized अर्थ आंतरराष्ट्रीय उत्तर महाराष्ट्र कोंकण क्रीडा ठळक बातमी ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड पुणे पुणे जिल्हा मराठवाडा मुखपृष्ठ राज्य

पालकांनों सावधान.. आरटीईचे दलाल पुन्हा सक्रीय

प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याचे होतेय पालकांची लूट

अशी होते फसवणूक
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे यामध्ये थेट हस्तक्षेप करता येत नाही. परंतु काही दलाल पालकांकडून पैसे घेतात व नियमित त्या विद्यार्थ्यांचा अर्ज आरटीई प्रक्रियेतून भरुन घेतात. जर विद्यार्थ्यांचा नंबर नियमित प्रक्रियेत लागला तर तो आम्हीच सांगून लावून घेतला असल्याचे सांगत पालकांकडून पैसे घेतात. अशिक्षित पालकांनाही आपले मूल इंग्रजी शाळेत जावे असे वाटत असल्याने ते पालक अगदी कर्ज काढूनही ही रक्‍कम देण्यास तयार होतात.

पुणे- तुमच्या मुलाचे अमुक तमुक शाळेत आरटीईतून ऍडमिशन करुन देतो, ऐंशी हजार रुपये द्या.. असे सांगणारे आमच्या तुमच्यातले नाही तर शिक्षण विभागातील काही गट आता यावर्षीच्या प्रक्रियेसाठी पुन्हा सक्रीय झाले आहेत. 25 टक्‍के मोफत प्रेवशांतर्गत प्रवेश मिळवून देतो असे सांगत पालकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून लाखो रुपये घेण्याचे प्रकार गेल्या काही काळात सुरु झाले आहेत.

हडपसरमधील एका विद्यार्थ्यांच्या पालकांना मागील वर्षी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका पदाधिकाऱ्याने मागील वर्षी ऐंशी हजार रुपये मागितले होते. त्या मुलांचे प्रवेश अमुक तमुक शाळेत करुन देतो असेही सांगण्यात आले होते. मात्र त्या मुलाला प्रवेश मिळालाच नाही. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगेचच काही ठाराविक दलाल पालकांना फोन करुन फॉर्म भरा मी तुमचे काम करुन देतो असे सांगतात. यामध्ये शिक्षण मंडळातील काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोपही झाला आहे. हे दलाल आम्ही शिक्षण विभागातच काम करत असून आमचे एक शिफारस पत्र गेले तर असे काम करता येते असे सांगतात.

शिक्षण विभागातले अधिकारी मात्र गप्प
ज्या शिक्षण विभागातून अशा तक्रारी येत आहे त्या विभागातील अधिकारी मात्र यावर गप्प बसणेच पसंत करत आहेत. याबाबत विचारणा करण्यासाठी शिक्षण विभागाचे शिक्षणप्रमुख दिपक माळी यांच्याशी सातत्याने संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.

मागील वर्षी पालकांना शाळा निवडीची संधी एकापेक्षा जास्त होती. त्यामुळेच सतत प्रयत्न केल्यानंतर कोणत्या ना कोणत्या शाळेत त्यांना सहज प्रवेश मिळत होता. मात्र त्यामुळेच कोणत्याही शाळेत प्रवेश झाला तरीही तो आमच्यामुळेच झाला असे सांगत पालकांची फसवणूक केली जात होती. काही पालक तर स्वत:हून शिक्षण विभागात पैसे देऊन अशी कामे करुन द्या अशी मागणी करत होते.