Top News अर्थ आंतरराष्ट्रीय क्रीडा ठळक बातमी ताज्या बातम्या पुणे पुणे जिल्हा मराठवाडा

बळी गेले तरीही जलिकट्टु, पतंगोत्सव सुरू

मंचर -गुजरामध्ये पंतग उडविताना झालेल्या दुर्घटनांमध्ये 16 लोकांचे बळी गेले. तर 4 हजार 26 पक्षी जखमी झाले. त्यापैकी 214 पक्षांचा मृत्यू झाला. नेहमी बैलगाडा शर्यतींच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या प्राणी मित्र संघटनांनी व केंद्र शासनाने आजवर गुजरातमध्ये पंतगोत्सवाला बंदी का नाही आणली? तामिळनाडूमध्येही राज्य सरकारने कायदा करून जलिकट्टू बैलांच्या स्पर्धा सुरू केल्या. या स्पर्धांना तिथले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहतात. मागील आठवड्यात जलिकट्टू स्पर्धेदरम्यान चार जणांचा बळी गेला, 79 लोक जखमी झाले. तरी त्यांच्या खेळावर बंदी नाही. मात्र, ज्या बैलगाडा शर्यतीमुळे जीवितहानी होत नाही, प्राण्यांना इजा झाल्यास त्यांचा विमा काढून उपचार केले जातात. जे शेतकरी स्वत:च्या मुलांप्रमाणे आपल्या बैलांची काळजी घेतात.अशा बैलगाडा शर्यतीवर मात्र, बंदी आणली जाते. हा प्राणी मित्र संघटनेचा व केंद्र शासनाचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

मुळात भाजप सरकारमधील अनेकांना प्राणी मित्र संघटनेचा पुळका आहे. बैलगाडा शर्यत न्यायप्रविष्ठ बाब असली तरी सरकारची मनापासून इच्छा असेल तर लोकसभेत व राज्यसभेत कायदा करायला काहीही अडचण नाही हे माझे ठाम मत आहे. – शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचे विधेयक तत्काळ सादर करा, अशी मागणी लोकसभेत व केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. मात्र, त्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी सपशेल हातवर करत बैलगाडा शर्यत न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण सांगून विधेयक सादर करणार नसल्याचे सांगितल्याने शासनाविरूद्ध बैलगाडा मालक आणि शौकिनांकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास येऊ लागल्या आहेत.

यासंदर्भात खासदार आढळराव पाटील म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी बैलगाडा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने या कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक मांडता येणार नसल्याचे मला लेखी पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, एखादा विषय न्यायप्रविष्ठ असला तरी त्यामुळे कायदानिर्मितीपासून संसदेला रोखता येऊ शकत नाही, असा निर्वाळा दि. 10 डिसेंबर 1968 रोजी लोकसभेत झालेल्या चर्चेवेळी नियम 123 अंतर्गत लोकसभा अध्यक्षांनी दिलेला आहे. त्यामुळे मंत्री महोदयांची मनापासून इच्छा असल्यास यासंबंधित विधेयक लोकसभेत व राज्यसभेत मांडायला काहीच हरकत नाही, हे स्पष्ट आहे. गेल्या आठवड्यात अनेक दुर्दैवी घटना घडल्या.

गुजरातमध्ये पंतग उडवताना 16 जणांचा मृत्यू झाला. शेकडो पक्षी दगावले. मग गुजरातमध्ये पंतगोत्सवाला बंदी आणणार का? दुसरीकडे तमिळनाडूत जलिकट्टूमध्ये गेल्या आठवड्यात चार लोकांचे बळी गेले, तरी तिकडे बंदी नाही. मग कुठलीही जीवितहानी न होणाऱ्या बैलांना पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरच बंदी का? असा सवाल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विचारला आहे.