Top News Uncategorized अग्रलेख अर्थ अर्थसार अस्मिता अहमदनगर आंतरराष्ट्रीय आरोग्य जागर उत्तर महाराष्ट्र करिअरनामा कोंकण क्रीडा ठळक बातमी ताज्या बातम्या पिंपरी-चिंचवड पुणे पुणे जिल्हा मुखपृष्ठ मुंबई युफोरिया राज्य विदर्भ व्हिडीओ संपादकीय लेख

बोर्डाकडून पीसीएमबी विषयांसाठी प्रश्‍नपेढी जाहीर

पुणे – विद्यार्थ्यांना नीट व जेईईसारख्या परीक्षांना सामोरे जाणे सोपे जावे यासाठी इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या काठिण्यपातळीत बदल करण्याबरोबर विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन प्रश्‍नपेढी तयार करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या विषयांची इयत्ता अकरावीची प्रश्‍नपेढी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य बोर्ड) जाहीर करण्यात आली आहे.

राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम व देशपातळीवर प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमात मोठी तफावत असल्याने राज्यातील विद्यार्थी या परीक्षांमध्ये मागे पडत असल्याची नाराजी विद्यार्थी व पालकांकडून केली जाते. यापार्श्वभुमीवर मंडळाकडून अभ्यासक्रमात काही बदल करण्याबरोबरच प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे. त्यानुसार यंदापासून इयत्ता अकरावीची परीक्षा सुधारीत स्वरूपानुसार होणार आहे. तर पुढील वर्षीपासून बारावी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदललेले असणार आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांचे प्रश्‍न सोडविण्याचा सराव असवा म्हणून त्यांच्यासाठी प्रश्‍नपेढी तयार करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता.

त्यानुसार राज्य मंडळाने राज्यातील तज्ज्ञ व शिक्षकांकडून या प्रवेश परीक्षांमध्ये येणाऱ्या संभाव्य प्रश्‍नांची विचारणा केली होती. या प्रश्‍नांचे संकलन करुन हे संभाव्य प्रश्‍न विद्यार्थ्यांना सरावासाठी ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता. त्यानुसार नुकतेच इयत्ता अकरावीसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित व संख्याशास्त्र या चारही विषयांची प्रश्‍नपेढी प्रत्येक धड्यानुसारhttps://mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे. हे प्रश्न केवळ बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. त्यामुळे आता या प्रश्‍नांचा सराव करुन विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जाता येणार आहे.